समुद्रात जातायेत सावधान, चंद्र आहे साक्षीला ! - Marathi News 24taas.com

समुद्रात जातायेत सावधान, चंद्र आहे साक्षीला !

www.24taas.com, मुंबई
 
चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आज समुद्राला मोठं उधाण येणार आहे. त्यामुळे वीकेण्ड साजरा करण्यासाठी समुद्रावर जाणाऱ्यानं सावधानता बाळगण्याचं आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं केलं आहे. विशेषतः मुंबईतल्या समुद्रात तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी आणि पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र यामुळे समुद्राला भरती-ओहोटी येत असते.
 
या भ्रमण कक्षेत नेहमी बदल होत असतात. काही वेळा चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानं समुद्राला मोठी भरती येते. ही घटना नैसर्गिक असली तरी खवळलेल्या समुद्रात सावध रहाणं गरजेचं असतं. त्यातच मान्सूनपूर्व करंट आणि वाऱ्याचा वेग वाढल्यास लाटांची उंची वाढते आणि समुद्राचं पाणी किनारपट्टीत घुसण्याची शक्यता वाढते.
 
या घटनेमुळे आज सकाळी ११ वाजून ९ मिनिटांनी मोठी भरती येईल, असं राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संचालकांनी सांगितलं आहे. दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी ४.८५ मीटर इतक्या उंच लाटा उसळतील तर रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ४.३८ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. त्यामुळे समुद्र किनारपट्टीच्या भागात त्यामुळे सावधगिरी बाळगावी असं आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं केलं आहे.
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 13:38


comments powered by Disqus