Last Updated: Wednesday, September 11, 2013, 12:04
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईगणेशोत्सवामुळं गर्दीनं फुलून गेलेल्या दादरच्या फुलबाजारात आज सकाळी तयार कपड्याच्या गोदामाला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहाय्यानं, दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं, या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, या आगीमुळं दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे. दादरच्या सेनापती बापट पुलावर ट्रॅफिक जॅम झालं असून स्टेशनला लागूनच असलेल्या रस्त्यावरही वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
सध्या गणपतीचे दिवस असल्यामुळं या मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. मात्र सकाळी आग लागल्यामुळं परिसरात खळबळ उडाली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं, तरी शॉर्ट सर्किटमुळंच ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
सेनापती बापट मार्गावरील उपेंद्र नगर भागात मनीष मार्केट शेजारी असलेल्या रेडिमेड कपड्याच्या बंद गोदामातून धूर येत असल्याचं सकाळी पावणेनऊच्या सुमारास आजूबाजूच्या दुकानदारांनी पाहिलं. त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, September 11, 2013, 11:57