Last Updated: Wednesday, October 3, 2012, 10:04
www.24taas.com,मुंबईप्राचीन तोफेची चोरून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना धारावी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २० इंच लांब, साडेतीन इंच व्यासाची आणि २५ किलो वजनाची तोफ हस्तगत करण्यात आली. या तोफेच्या विक्रीतून ६५ लाख रूपये मिळणार होते.
प्राचीन तोफेच्या विक्री होणार असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक सुर्वेगंध आणि पथकाला मिळाली होती. त्याप्रमाणे धारावी पोलिसांनी टी जंक्शनजवळ सापळा रचून प्रतापसिंग धरमशेटर पालसिंग (५२), विजयेंद्र चौहान ऊर्फ विजय (३२) आणि सुरेंद्र बन्सीलाल गुप्ता ऊर्फ संजय (४५) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता काळ्या बॅगेत तोफ सापडली.
ही तोफ दिसायला लहान असली तरी त्यात स्फोटके भरून बत्ती दिल्यास ती धडाडेल. त्यामुळे आरोपींविरोधात भारतीय हत्यार कायद्यातील ३(२५) कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
First Published: Wednesday, October 3, 2012, 10:04