Last Updated: Tuesday, October 29, 2013, 08:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्तची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. संजय सध्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर आहे.
कैद्यांनं संचित रजेचा फॉर्म भरल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याच्या संचित रजेवर विचार केला जातो. संजयला तुरुंगात जाऊन केवळ दोन महिने झालेत. मात्र त्यानं अर्ज केल्यानंतर काही दिवसांतच त्याला पॅरोल मिळाला. तसंच पॅरोल मिळाल्यानंतर लगेच संजय दत्तला रजा वाढवूनही मिळाली. त्यामुळं संजय दत्तला वेगळा न्याय का? असा सवाल विचारला जातोय.
संजय दत्तनं नवरात्र आणि दसरा पत्नी आणि मुलांसोबत साजरा केला असला तरी त्याची दिवाळी तुरुंगात इतर कैद्यांसोबत असणार आहे. १ ऑक्टोबर रोजी पॅरोलवर बाहेर आलेल्या संजय दत्तची रजा २९ ऑक्टोबरला म्हणजे आज संपतेय.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावलेली असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे. सुरवातीच्या १४ दिवसांची रजा संपल्यानंतर वैद्यकीय कारण देत त्याने आणखी १४ दिवसांची रजा मागितली होती, ती देखील येरवाडा कारागृहानं मंजूर केली होती.
दरम्यान, संजय दत्तची पाच वर्षांची शिक्षा कमी करावी अशी मागणी करणारा अर्ज राष्ट्रपती कार्यालयात पोहोचला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 29, 2013, 08:15