ज्युनिअर देवरा - ज्युनिअर ठाकरेंचं `ट्विटरवॉर`, twitter war between junior deora - junior thackeray

ज्युनिअर देवरा - ज्युनिअर ठाकरेंचं `ट्विटरवॉर`

ज्युनिअर देवरा - ज्युनिअर ठाकरेंचं `ट्विटरवॉर`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यात आज जोरदार आमना-सामना झाला. रस्त्यावर उतरून राडे करणाऱ्या शिवसेनेचं युवा नेतृत्व आणि दक्षिण मुंबईचे युवा खासदार एकमेकांना भिडले. पण, हे युद्ध रंगलं ते ट्विटरच्या वॉलवरून...

निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडू लागलेत. पण, मुंबईमध्ये वेगळंच वॉर रंगलं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या मुंबई दौऱ्यावर असून वादग्रस्त कॅम्पा कोला इमारतीतील रहिवाशांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच पोलिसांनी कॅम्पा कोला रहिवाशांना अटक केली. बस्स त्यावरूनचं रंगलं पुढचं सगळं महाभारत...

शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या घटनेचं भांडवल करणारं ट्विट केलं आणि काँग्रेसचे खासदार व केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावरून ज्युनिअर देवरा आणि ज्युनिअर ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालं. एकमेकांना चिमटे काढत, परस्परांची ऊणी-दुणी त्यांनी ट्विटरवरच काढली.
 

कसं रंगलं हे `ट्विटर` युद्ध पाहुयात...
आदित्य ठाकरे - अच्छा, काँग्रेस उपाध्यक्षांना भेटायला आलेल्या कॅम्पा कोला रहिवाशांचं गा-हाणं ऐकण्याऐवजी या नऊ मुंबईकरांना अटक करण्याची गरज काय होती? यावरून सिद्ध होतं की, दक्षिण मुंबईच्या काँग्रेस खासदारांचा कॅम्पा कोलावासियांना असलेला पाठिंबा खोटा आणि पीआर स्टंट होता.

मिलिंद देवरा - तुमच्या माहितीसाठी, मी आताच कॅम्पा कोला रहिवाशांना भेटलो. त्यांना प्रश्न पडलाय की, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने त्यांचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात धुडकावून का लावला?

आदित्य ठाकरे - ते तुम्हाला खूप वेळा भेटले, आता त्यांना राहुल गांधींना भेटायचंय. मुंबई महापालिका केवळ राज्य सरकारचे नियम पाळते. मुख्यमंत्र्यांनी आपलं आश्वासन पाळायला हवं.

आदित्य ठाकरे - मग, आधी ताब्यात घेतलं आणि मग का भेटलात? मी ट्विट करण्याआधीच आणि ही बातमी बाहेर पडण्याआधीच का नाही भेटलात?

आदित्य ठाकरे - मला इथं ट्विट वॉर चालवायचं नाही, पण त्यांना जी वागणूक मिळाली त्याचं मला दुःख झालं. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला काय करायचं, ते सांगितलं पाहिजे.

मिलिंद देवरा - मुंबई महापालिका चांगली कामं करते, तेव्हा तुम्ही त्याचं श्रेय लाटता, पण जेव्हा अडचणीचं असतं तेव्हा दुसऱ्यावर ढकलता. मुख्यमंत्र्यासोबत शिवसेनेनेही आपलं काम करायला हवं.

आदित्य ठाकरे - मी आधीही सांगितलंय, आता पुन्हा सांगतो. आम्ही तयार आहोत. मुख्यमंत्री महापालिकेला काय सूचना देतात, त्याची वाट पाहतोय. चांगलं झालं तर त्याचं सगळं श्रेय त्यांना देऊ..

आदित्य ठाकरे - आपण ट्विटर वॉर नको करूया... मला एवढंच म्हणायचं होतं की, त्यांना अटक व्हायला नको होती. मला वाटतं तुम्ही हे मान्य कराल.

मिलिंद देवरा - दॅटस द स्पिरीट... जबाबदारी घ्या, केवळ इतरांवर ढकलू नका किंवा ब्लेम गेम खेळू नका.

आदित्य ठाकरे - मला तेच तर म्हणायचं होतं. त्यांना अटक करणं योग्य नाही.

आदित्य ठाकरे - मिलिंद, माझ्या मित्रा... आपण हे असंच आणखी पुढं सुरू ठेवू शकतो. मला आशा आहे की, पुढच्या वेळी त्यांना अटक होणार नाही आणि मुख्यमंत्री त्यांचं काम करतील.

आणि त्यानंतर हे ट्विटर वॉर थांबलं... पण बदलत्या काळात रस्त्यावरची राडा संस्कृती ट्विटरच्या व्यासपीठापर्यंत कशी येऊन ठेपलीय, याची झलक यानिमित्तानं पाहायला मिळाली.
 



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 20:30


comments powered by Disqus