Last Updated: Thursday, February 28, 2013, 20:43
अमित जोशी, www.24taas.com, मुंबईमोनो रेल्वेच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने थांबा आणि वाट पहा अशी भुमिका घेतली आहे. मोनोरेल्वेला मिळणारा नागरीकांचा प्रतिसाद तसंच मोनोरेल्वेची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं एमएमआरडीएचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना ह्यांनी स्पष्ट केलंय.
लोकल सेवा, मेट्रो सेवा ह्यापेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाची रेल्वे म्हणून मोनो रेल्वे ओळखली जाते. भारतात मोनो रेल्वेचे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले जात आहे. त्यामुळे एमएमआरडीएने मोनो रेल्वेबाबात काही निर्णय घेतले आहेत.
त्यामुळे या तंत्रज्ञानाचा अनुभव, मोनो रेल्वे चालवण्याचा अनुभव एमएमआरडीए घेणार आहे. मेट्रोच्या तुलनेत कमी गर्दीच्या ठिकाणाहून जाणा-या मोनो रेल्वेला नागरीकांचा प्रतिसाद कसा मिळतो याची चाचपणीही एमएमआरडी करणार आहे. त्यानंतर मुंबई आणि परिसरातील मोनो रेल्वेच्या प्रस्ताविक 8 मार्गांबाबत निर्णय घेणार आहे. ऑगस्टमध्ये चेंबूर-वडाळा हा पहिला टप्पा सुरु होत आहे. तर 2014 च्या ऑगस्टमध्ये उर्वरीत वडाळा-जेकब सर्कल हा टुसरा टप्पा सुरु होणार आहे.
मोनो रेल्वेचा मार्ग बांधतांना अपघातापासून ते परवानगीपर्यंतचे अनेक अडथळे एमएमआरडीएला पार करावे लागले होते. त्यातच जर नागरीकांचा प्रतिसाद कमी मिळाला किंवा वाहतूक सुरु ठेवण्यात अडथळे एमएमआरडीएला आले तर चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल हा मुंबईतील मोनो रेल्वेचा पहिला आणि एकमेव मार्ग ठरण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, February 28, 2013, 20:43