Last Updated: Monday, January 28, 2013, 13:19
www.24taas.com, मुंबई उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच खराब झाली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांना आज सकाळपासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागलं.
पहाटेच्या सुमारास पश्चिम रेल्वेची लोकल यार्डमध्ये जाताना एक डबा घसरला. त्यामुळं सकाळच्य़ा वेळेस बोरिवलीकडून चर्चगेटकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळपासून स्लो ट्रॅकवरील 20 टक्के लोकल रद्द झाल्यात. डबा घसरल्याचा परिणाम स्लो ट्रॅकवरील वाहतुकीवर झालाय. बोरिवली, कांदिवली, अंधेरी मालाड, गोरेगाव स्टेशन्सवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली. रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तर दुसरीकडे ठाणे वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील एरोलीजवळ लोकलचा पेंटाग्राफ तुटला. त्यामुळं ठाणे- वाशी रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होती. हे कमी की काय मध्य रेल्वेनंही मान टाकली. मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनजवळ फाटकात डंपर अडकला होता. त्यामुळं मध्य रेल्वेच्या फास्ट आणि स्लो ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
काही वेळानंतर स्लो लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूकही हळूहळू पूर्ववत करण्यात आलीये. रेल्वेच्या या खोळंब्यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना लेट मार्क बसलाय.
First Published: Monday, January 28, 2013, 13:19