Last Updated: Thursday, November 8, 2012, 18:17
www.24taas.com, मुंबईदोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आणि राज यांच्या दौ-याच्या फलनिष्पतीवरून चर्चा रंगू लागल्या.
नाशिकरांना दिलेल्या वचनांची पुर्ती करण्यासाठी राजसाहेब नाशकात आल्याचं चित्र मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांनी रंगविलं खरं, मात्र राजनी ज्या काही दोन-चार बैठका घेतल्या त्यात पक्षाच्या स्थानिक शिलेदारांनाच बाजूला ठेवण्यात आलं. महापालिका आयुक्त आणि राज यांच्यात बंद खोलीत झालेल्या भेटीचा तपशील अजूनही बाहेर कळू शकला नाही. बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा कुणाच्या फायद्याची ठरली. हेही काही कळायला मार्ग नाही. नाशिकरांना विश्वासात न घेता राज यांचा पूर्ण झालेला मौनी दौरा एक फार्स असल्याचं विरोधकांनी म्हटलंय.मनसे अध्यक्षांचा हा दौरा खाजगी होता. तरीही त्यांनी आयुक्तांशी आणि अधिका-यांशी चर्चा केल्याची प्रतिक्रिया देत मनसे पदाधिकारी राज यांनी नाशिककरांवर जणू उपकार केल्याचं सांगण्याचा प्रयत्न करतायत.
नाशिकच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार असल्याचं प्रचारसभेत सांगणा-या राज ठाकरेंची ही ब्लू प्रिंट गेली तरी कुठं आणि नाशिकरांना विश्वासात न घेता हि ब्लू प्रिंट मुंबईकर तयार करणार का? असा सवाल नाशिककर विचारतायत.
First Published: Thursday, November 8, 2012, 18:08