कोण होणार मुंबई पोलीस दलाचे नवे पोलीस आयुक्त? Who will be next mumbai CP

कोण होणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त?

कोण होणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त?
www.24taas.com,अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय. उत्तर प्रदेशातल्या मेरठमधी दोन फेब्रुवारीच्या नरेंद्र मोदींच्या सभेत ते अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.

डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. 

राज्याच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक श्रीदेवी गोयल सेवानिवृत्त झाल्यावर डॉ. सत्यपाल सिंग यांना महासंचालकपदी बढती मिळणं अपेक्षित होतं. पण आपलं राजकीय वजन वापरून सत्यपाल सिंग यांनी या विषयाला बगल दिली.

सत्यपाल सिंग यांच्या या खेळीमुळे सेवाज्येष्ठतेनुसार मुंबई पोलीस आयुक्तपदी विराजमान होण्याचं जावेद अहमद यांचं पद हुकलं.
 
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अरूप पटनाईक यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय. आणि इतर महासंचालकांच्या रिक्त असलेल्या तीन पदांवर अनुक्रमे डॉ. सत्यपाल सिंग, के. पी. रघुवंशी, आणि जावेद अहमद यांची वर्णी लागू शकते.

राज्याच्या महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय कांबळे हे सेवाज्येष्ठतेनुसार मुंबईचे पोलीस आयुक्त बनू शकतात. कांबळे यांची वर्णी लागल्यास त्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो. त्यामुळे राकेश मारिया यांचं हे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता आहे.

राकेश मारिया यांना आयुक्तपदी विराजमान करायचं असल्यास चार ते पाच वरिष्ठ अधिका-यांची सेवाज्येष्ठता गृहखात्याला नजरेआड करावी लागणार आहे. पुण्याच्या आयुक्तपदी गुलाब पोळ यांची वर्णी लावताना सेवाज्य़ेष्ठतेचा निकष डावलला गेला होता.

मुंबईत घडत असलेले गंभीर गुन्हे पाहता मुंबईच्या आयुक्तपदासाठीही राज्यसरकार पुणे पॅटर्न वापरण्याची शक्यता आहे. पण येत्या काळात होत असलेल्या निवडणुका लक्षात घेता विजय कांबळे यांची वर्णी लावून मराठी कार्ड खेळण्याची सरकारची नितीही नजरेआड करता येणार नाही.

मुंबईत गेल्या काळी काळात महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झालीय. हे प्रकार पाहता धाडसी निर्णय घेणा-या महिला अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाचीही आयुक्तपदासाठी चर्चा आहे. त्यांची या पदावर वर्णी लागली तर मुंबईच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनण्याचा मान त्यांना मिळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 31, 2014, 20:49


comments powered by Disqus