Last Updated: Tuesday, October 8, 2013, 14:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पासपोर्ट नसल्यानं आपल्याला परदेश दौऱ्यावर जाता येत नाही आणि आपल्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचा दावा करत, अभिनेत्री मोनिका बेदी हिनं पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अबू सालेमची मैत्रिण असलेल्या मोनिकावर गुन्हेगारी स्वरुपाचे कुठलेही आरोप नसल्याचं स्पष्ट होईपर्यंत तिला पासपोर्ट देता येणार नाही, असा खुलासा क्षेत्रीय पासपोर्ट विभागानं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय.
मोनिकाने नव्याने पारपत्र देण्यासंदर्भात केलेल्या याचिकेवर वारंवार आदेश देऊनही उत्तर दाखल न करणाऱ्या पारपत्र कार्यालयाला न्यायालयाने मागच्या सुनावणीच्या वेळेस स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांच्या खंडपीठासमोर याबद्दल सुनावणी झाली. यावेळी क्षेत्रीय पारपत्र विभागाने प्रतिज्ञापत्राद्वारे मोनिकाला अद्याप पारपत्र न देण्यामागील कारण स्पष्ट केलंय.
मोनिकाला नव्याने पारपत्र देण्याबाबत महाराष्ट्र, दिल्ली आणि हैदराबाद पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र मागवण्यात आलंय. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय मोनिकाने तिच्याविरुद्ध हैदराबाद न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सद्यस्थितीची माहितीही दिलेली नाही. या सर्व कारणास्तव तिला पारपत्र दिलं गेलं नाही, असं पारपत्र विभागातर्फे सांगण्यात आलंय.
सालेम आणि मोनिकाला पोर्तुगाल पोलिसांनी अटक केल्यानंतर २००५ मध्ये हस्तांतरण कायद्यांतर्गत पोर्तुगाल सरकारने दोघांनाही भारताच्या हवाली केले होते. त्याच वर्षी मोनिकाला बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळविल्याप्रकरणी दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा झाली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 8, 2013, 14:59