पत्नीने केली पोलिसाची हातोड्याने हत्या, Wife killed by husband in Mumbai

मुंबईत पत्नीने केली पोलिसाची हातोड्याने हत्या

मुंबईत पत्नीने केली पोलिसाची हातोड्याने हत्या
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

मुंबईत मरोळ पोलीस कॅम्पमध्ये एक धक्कादायक घटना घडलेय. पोलीस दलातील हत्यारी विभागात सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या नंदकिशोर टाकसाळकर (४३) यांची त्यांच्या पत्नीनेच हातोड्याचा घाव घालून हत्या केली. हत्येनंतर पत्नी पार्वती हिने स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. मी माझ्या पतीचा खून केलाय, अशा शब्दांत पार्वतीने गुन्ह्याची कबुली दिली.

दुपारी तीनच्या सुमारास मरोळ पोलीस कॅम्पमधील ई-३ इमारतीतील टाकसाळकर यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. या हत्येची घटना १५ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी पाहिली. पार्वतीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पार्वतीला ताब्यात घेऊन माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र या महिलेचे पती पोलीस अधिकारी असल्याचे समजताच सारेच अवाक् झाले.


घराबाहेर जमलेली गर्दी हटवत पोलीस आत शिरले, तेव्हा टाकसाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. शेजारी रक्ताने माखलेला हातोडा आणि कोयताही आढळला. टाकसाळकर यांना पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने होली स्पिरीट रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे नंदकिशोर यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, दीड वर्षापूर्वी टाकसाळकर-पार्वती यांचा विवाह झाला होता. दोघांचाही हा दुसरा विवाह होता, असे समजते.

टाकसाळकर यांना दारूचे व्यसन होते. शिवाय त्यांचा पार्वती यांच्या चारित्र्यावर संशय होता. दारूच्या नशेत याच मुद्दय़ावरून ते पार्वती यांच्याशी वाद घालत आणि त्यांना मारझोडही करीत. हा अत्याचार गेल्या काही महिन्यांपासून न चुकता सुरू होता. हत्येपूर्वी दोघांचे टोकाचे भांडण झाले. त्या वेळी सहनशक्तीचा कडेलोट झाल्याने पार्वती यांनी दारूच्या नशेतील टाकसाळकर यांच्या डोक्यात हातोडा आणि लादीचे घाव घातले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिलेय.

First Published: Monday, April 29, 2013, 08:53


comments powered by Disqus