राज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री, marathi bhasha bhavan - cm

राज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री

राज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री
www.24taas.com,मुंबई

राज्याची भाषा मराठी आहे. या माय मराठीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा भवनाची लवकरच निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आज मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा झाला. त्या वेळी ते बोलत होते. त्यावेळी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, मराठी विश्विकोश मंडळाच्या अध्यक्ष विजया वाड आदी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. बोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा अकादमीची स्थापना करण्यात येत आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

साहित्यिकांचा गौरव करण्याचे काम केवळ महाराष्ट्रातच होते. मातृभाषेत लेखन करण्याचे समाधान वेगळे असते. त्यामुळेच आजचा पुरस्कार मिळाला, अशी भावना के. ज. पुरोहित तथा शांताराम यांनी २०११चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. साहित्यिकांप्रमाणे समीक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे कर्णिक म्हणाले.

यावेळी मराठी वाचकांना कमीत कमी किमतीला पुस्तके उपलब्ध करून देण्याची सूचना समीक्षक सुधीर रसाळ यांनी प्रकाशकांना केली. या समारंभात उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवचैतन्य प्रकाशन संस्थेला श्री. पु. भागवत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधीर रसाळ आणि वसंत अवसरीकर यांना गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.

मराठी-जर्मन शब्दकोश, महाराष्ट्राचे शिल्पकार अनंत भालेराव, कृषी संवादक : महात्मा फुले, मराठी शब्दकोश खंड ५, महाराष्ट्राचे शिल्पकार र. धों. कर्वे, शेक्सतपिअर परिचय ग्रंथ, महाराष्ट्राचे शिल्पकार लोकमान्य टिळक` या पुस्तकांचे आणि दासबोध, प्रवासी पक्षी, रसयात्रा, संहिता व आदिमाया, कृष्णाकाठ या पुस्तकांचे (ऑडिओ बुक) या वेळी प्रकाशन करण्यात आले.

First Published: Thursday, February 28, 2013, 19:21


comments powered by Disqus