Last Updated: Tuesday, January 22, 2013, 14:28
www.24taas.com, चंद्रपूरबलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या एका आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्याची जामिनावर सुटका झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी पॅरोलवर सोडण्यात आलेल्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने दहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिचा खून केला होता. आता चंद्रपूर पोलिसांच्या या गलथान कारभारावर सामाजिक संघटनांनी टीका केली आहे.
चंद्रपूर कनिष्ठ न्यायालयाने सुखदेव साव या आरोपीची जामिनावर सुटका केली आहे. दुर्गापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या किटाळी गावातील एका साडेचार वर्षीय मुलीवर तिच्याच घरासमोर राहणा-या सुखदेव साव या ५२ वर्षीय व्यक्तीनं बलात्कार केला. २० सप्टेंबर २०१२ रोजी ही घटना घडली. २१ सप्टेंबरला गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र पोलिसांनी या प्रकरणात ९० दिवसांच्या आत कोर्टात आरोपपत्र दाखल न केल्यामुळे चंद्रपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका-यानी २१ डिसेंबरला आरोपी सुखदेव साव याची जामिनावर सुटका केली.
पिडीत मुलीचे आई-वडिल हे अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना आरोपीची सुटका कशामुळे झाली हे उमगलेच नाही. मात्र प्रहार या सामाजिक संघटनेने या प्रकरणात लक्ष घातल्यावर पोलिसांच्या गलथान कारभाराची बाब समोर आली.
First Published: Tuesday, January 22, 2013, 14:20