आसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी , Asaram Bapu, Holi, wastage of Water

आसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी

आसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी
राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, स्वत:ला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी केली. नेहमी प्रमाणे रविवारी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आसाराम बापू आले आणि त्यांनी हजारो भक्तांवर पाण्याचे फवारे उडवले.

नागपूर महानगरपालिकेनं पुरवलेल्या टँकरच्या माध्यमातून पाण्याच्या नासाडीचा हा खेळ झाला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव असतानाही आणि नागपुरातही उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवत असलं तरीही भक्तांपैकी एकानंही त्यांचा विरोध केला नाही. आसाराम बापूंनी ही धुळवड साजरी केली.

जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, अशी संतांची महाराष्ट्रात ओळख. राज्यातली जनता दुष्काळात होरपळत असताना, ही अशी धुळवड साजरी करणा-या आसाराम बापूंना संत म्हणायचं का, असा संतप्त सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय. आता राज्यभरातून आसाराम बापूंच्या या कृत्यावर चौफेर टीकेला तोंड फुटलंय.

दरम्यान झी २४ तासच्या या दणक्यानंतर बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणारय. खुद्द नागपूर मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी हे आश्वासन दिलंय. दुसरीकडे नागपूरच्या महापौर आणि आयुक्तांना आम्ही सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. पण यावर प्रतिक्रिया द्यायला ते तयार नाहीत.

तर दुसरीकडे अंनिसचे नरेंद्र दाभोळकर यांनी आसाराम बापूंच्या या धुळवडीवर संताप व्यक्त केलाय. शिवाय सामान्यांनीही संत म्हणून घेणा-या व्यक्तींना कितपत महत्व द्यावं याचा विचार करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.

First Published: Monday, March 18, 2013, 11:07


comments powered by Disqus