bailpola... festival of farmer`s, 24taas.com

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!
www.24taas.com, जळगाव
बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुमारे आठवडाभर आधीच शेतकऱ्यांचं कुटुंब या सणाच्या तयारीला लागतं. वर्षभर काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेतकऱ्याला मदत करणाऱ्या बैलाचा पोळ्याला सन्मान करण्यात येतो. सणाअगोदर दोन ते तीन दिवस बैलाला केवळ खानपान आणि विश्रांती देण्यात येते.

पोळ्याच्या दिवशी बैलाला पूर्ण सजवण्यात येतं. शिंगांची सफाई करुन आकर्षक रंगरंगोटी करण्यात येते. नक्षीदार रंगीबेरंगी झुल बैलाच्या अंगावर टाकून त्याला गोंडे बांधले जातात. आपल्या आवडत्या सर्जा-राजाचं रुप खुलवलं जातं. वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर बैलाची पूजा करतात. घराघरात खास पुरणपोळीचा बेत असतो.

अनेक गावांमध्ये बैलांच्या शर्यती तसेच सजावटीबाबत स्पर्धा होतात. पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा करण्याकडे अनेक गावांचा कल असतो. यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असल्यानं शेतकरी राजा चिंतेत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पोळ्याचा उत्साह मात्र कायम आहे.

First Published: Friday, August 17, 2012, 16:39


comments powered by Disqus