आसाराम बापूंच्या आश्रमावर हल्ला, भक्तांना मारहाण, Bhim Sena activists attack Asaram Bapu ashram near Nagpur

आसाराम बापूंच्या आश्रमावर हल्ला, भक्तांना मारहाण

आसाराम बापूंच्या आश्रमावर हल्ला, भक्तांना मारहाण

www.24taas.com, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर
राजस्थानच्या जोधपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपात अडकलेल्या आसाराम बापूंच्या नागपुरातील आश्रमात आज अज्ञात युवकांनी दगडफेक करत तोडफोड केली.

नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील फेटरी गावाच्या आश्रमात आज ही घटना घडली. आज दुपारी दुचाकी वाहनावर आलेल्या युवकांनी आश्रमात घुसून तोडफोड केली आणि आश्रमातील अनुयायांना मारहाण केली. घोषणा देत असलेल्या हल्लेखोरांमुळे आश्रमातील भक्त आणि निवासी बाहेर आले. हल्लेखोर जायच्या तयारीत असताना त्यांच्यापैकी एकाला आश्रमातील लोकांनी पकडले … दरम्यान हल्लेखोरांच्या मोटारसाइकल मागे राहिल्या … घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोलीस पोहचले आणि स्वप्निल गजभीये नावाच्या हल्लेखोर युवकाला ताब्यात घेतले … इतर आरोपीचा शोध सुरु आहे.

दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या आणि दुचाकी वाहनाच्या माध्यमातून पोलिस इतर आरोपींचा तपास करीत आहे. ह्या घटनेमागच्या नेमके कारणांचा शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात कळमेश्वर पोलीस गुन्हा नोंदवत असून आसाराम बापूंचे काही भक्त जखमी झाल्याचे त्यांनी मान्य केले. आश्रमातील लोकांचे म्हणणे आहे की, सुमारे ५० युवकांनी हल्ला केला, मात्र पोलीसांनी हल्लेखोर दहा ते बारा असल्याचे सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 20:43


comments powered by Disqus