Last Updated: Monday, September 17, 2012, 20:37
www.24taas.com, अकोलावाहन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत अकोला महानगरपालिकेत शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार तोडफोड केलीय. वाहन बिल घोटाळ्यातील दोषींवरील कारवाईसाठी विरोधक आक्रमक झालेत. या प्रकरणावर बोलण्यास सत्ताधारी तयार नसल्यानं घोटाळ्याच्या शंकेला नक्कीच वाव मिळतोय.
ज्या नगरसेवकांना अकोल्यातल्या जनतेनं निवडून दिलं त्याच नगरसेवकांचा धुडगूस बघून अकोलेकरांची मान नक्कीच शरमेनं खाली जाईल. वाहन बिल घोटाळ्यावरुन हे रणकंदन माजलंय. काँग्रेसचे उपमहापौर रफिक सिद्दिकी यांनी भाड्याची गाडी न वापरता त्यांच्या नावानं 3 महिन्यांचे बोगस बिल काढण्यात आल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते महापालिकेत आले. मात्र याचवेळी सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांना विरोध केल्यानं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि नगरसेवक आमनेसामने आले आणि सुरु झालं एकमेकांच्या अंगावर धावून जाण, गलिच्छ शिवीगाळ करणं. संतप्त सेना-भाजपच्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी विद्युत,पाणीपुरवठा विभागासोबतच उपायुक्तांच्या कार्यालयाची जोरदार तोडफोड केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गोंधळ घालणा-यांना ताब्यात घेतलं.
विरोधकांनी आयुक्तांच्या संदिग्ध भूमिकेवर टीका करत त्यांनाही घेराव घातला. या घोटाळ्यात सत्ताधारी अडचणीत येणार असल्यानं यावर बोलण्यास ते तयार नाहीत. प्रकरण अंगलट येवू लागल्यानं काँग्रेस नगरसेवक काजी नाजीमुद्दिन वृतांकन करणा-या पत्रकारांच्या अंगावर धावून गेले.
अकोला महापालिकेत सध्या कुणाचा पायपोस कुणाला राहिला नाहीय. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही आपले कर्तव्य विसरल्याचं समोर आलंय. सभागृहातील आयुधे न वापरता थेट कायदा हातात घेऊन अशाप्रकारे धुडगूस घालणं नक्कीच लोकशाहीला मारक ठरणारं आहे.
First Published: Monday, September 17, 2012, 20:37