खऱ्या नक्षलवाद्यांसोबत तोतया नक्षलवाद्यांचं आव्हान!, froad naxalist in gadchiroli

खऱ्या नक्षलवाद्यांसोबत तोतया नक्षलवाद्यांचं आव्हान!

खऱ्या नक्षलवाद्यांसोबत तोतया नक्षलवाद्यांचं आव्हान!
www.24taas.com, गडचिरोली

विदर्भातल्या नक्षलग्रस्त भागात तोतया नक्षलींचा सुळसुळाट झालाय. नक्षली असल्याचं सांगून खंडणी उकळणाऱ्या तीन जणांच्या टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केलीय. नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या नावाखाली व्यापारी, ठेकेदार आणि नेत्यांना लुटणाऱ्या या घटना रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय.

गडचिरोलीच्या अहेरी पोलिसांनी तीन बोगस नक्षलवाद्यांना अटक केलीय. आपण नक्षलवादी असल्याचं सांगून एका राजकीय पुढाऱ्यांकडे खंडणी मागणाऱ्या या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. गडचिरोलीतील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते बाबू हकीम यांच्याकडे तिघांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती. हकीम यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. अहेरी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल कॉल ट्रेस करीत आसरअल्ली इथ सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तुलही जप्त करण्यात आलंय. पकडलेले तिघेही जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशी माहिती अहेरीचे पोलीस अधिक्षक राहुल श्रीरामे यांनी दिलीय.

गडचिरोलीत नक्षली असल्याचं सांगून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढलेत. पोलिसांनी असे डझनभर तोतया नक्षलवाद्यांना गजाआड केलंय. यावरुन खंडणीखोरीचा हा व्यवसाय किती बहरला आहे, याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. खऱ्या नक्षलवाद्यांच्या कारवायांना तोंड देण्याबरोबरच या तोतया नक्षलवाद्यांचे उच्छाद रोखण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

First Published: Tuesday, January 15, 2013, 16:27


comments powered by Disqus