एक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!, Meal in Re.1 for farmers

एक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!

एक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!
www.24taas.com, झी मीडिया, खामगाव

एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय.. ज्या बळीराजाच्या जीवावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते, त्यांच्यासाठी समितीनं अशाप्रकारे अनोखी कृतज्ञताच व्यक्त केलीय.

शेतात काबाडकष्ट करुन बळीराजा कृषीमाल विकण्यासाठी बाजार समितीमध्ये घेऊन येतो... तिथं असलेल्या गर्दीमुळे माल विक्रीसाठी दोन दोन दिवस शेतक-यांचा नंबर लागत नाही... अशावेळी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन एक वेळचं जेवण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो.. हीच बाब लक्षात घेऊन बुलडाण्यातल्या खामगाव बाजारपेठेत एक रुपयात पोटभर जेवण ही योजना सुरु करण्यात आलीय.

सध्या सीझन नसल्यानं जवळपास ५०० शेतकरी इथं १ रुपयातल्या जेवणाचा लाभ घेत आहेत.. या योजनेसाटी कृषी उत्पन्न बाजार समितीने ३४ रुपये थाळीप्रमाणे ठेका दिलाय.. यापैकी २८ रुपये बाजार समिती, ५ रुपये व्यापारी तर एक रुपया शेतकरी देणार आहे. या जेवणाच्या थाळीत वरण, भात, भाजी-पोळी असं सात्विक जेवण दिलं जातं. तर गुरुवारी मिष्टान्न सुद्धा देण्यात येतं. या योजनेचं शेतक-यांनी स्वागत केलंय.

सा-या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कधी अर्धपोटी तर कधी उपाशी शेतात राबतो.. या शेतक-याच्या कष्टाच्या जोरावर बाजार समिती आणि व्यापा-यांना कोट्यवधीचं उत्पन्न मिळतं.. त्या बळीराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक रुपयात जेवण हा बाजार समितीने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 07:42


comments powered by Disqus