धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं Nagpur- third child girl was so In-law burnt w

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्‍यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.

मुखसुदन मोहन यादव (६०) आणि लीलाबाई मुखसुदन यादव (५५), अशी आरोपींची नावं आहेत. गंगा रोशन यादव (२८), असं मृत विवाहितेचं नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंगाचा विवाह आठ वर्षांपूर्वी रोशन यादव याच्यासोबत झाला होता. रोशन सेंट्रिंगची कामं करतो. लग्नानंतर एक वर्षानं गंगाला नंदिनी नावाची मुलगी झाली होती. त्यामुळं मुलगा झाला नाही म्हणून हे सासू-सासरे तिला सतत हिणवीत होते. मात्र गंगाला रोशननं संयम बाळगण्यास आणि आपल्या आई-वडिलांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं.

चार वर्षांनंतर गंगाला पुन्हा अंजना नावाची मुलगी झाली. त्यामुळं दोघेही मोठे संतप्त झाले होते. ते वारंवार तिचा छळ करायला लागले होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तिला मारहाण करून घरातून बाहेर काढत होते. पुन्हा सहा वर्षानंतर गंगाला अनसूया नावाची तिसरी मुलगी झाली. त्यामुळं पुन्हा तिचा मानसिक आणि शारीरिक छळ वाढला होता. त्यांच्या छळाला कंटाळलेल्या गंगानं पतीला सोबत घेऊन दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत या दोन्ही आरोपींना समजलं होतं.

अखेर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास रोशन हा बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी गेला होता. गंगाला घरात एकटी असल्याचं पाहून या दोघांनी मारहाण केली. तिला घराच्या बाहेर काढलं. काही वेळानंतर गंगा घरात येताच लीलाबाईनं तिला पकडून ठेवून मुखसुदन यानं तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं. गंगाला जळताना पाहून मोहल्ल्यातील लोक धावून आले. त्यांनी लागलीच या घटनेची सूचना कळमना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंगाला मेयो इस्पितळाकडे रवाना केलं. गंगानं पोलिसांना घटनेबाबत सांगितल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सासू-सासर्यासला अटक केलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 31, 2013, 18:42


comments powered by Disqus