Last Updated: Thursday, September 13, 2012, 18:05
अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूरजलवाहिन्या जुन्या आणि खराब झाल्यानं नागपुरातील काही वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुषित पाणी पुरवठा होतोय. शहरातील गळणाऱ्या जलवाहिन्यांमधून नागरिकांना फक्त गढूळ पाणीच नव्हे तर किडे देखील मिळत आहेत.
बाटलीमधील गढूळ पाण्यानंतर बादलीमधल्या पाण्यातील किडे बघितले की दुषित पाणी पुरवठ्याचा हा प्रश्न किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. हा प्रश्न एका ठराविक वस्तीमधील नसून नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये ही समस्या गेल्या काही काळापासून सतत भेडसावत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पाणी पुरवठा होतो आणि या दुषित पाण्यासंबंधी तक्रार केल्यावरही कारवाई झाली नसल्याची खंत नागपूरकरांनी व्यक्त केलीय. दुषित पाणी पुरवठ्यामुळं गॅस्ट्रोसारखे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
दुषित पाणी पुरवठा होत असल्याचं नागपूर मनपानं मान्य केलं असलं त्याचं खापर अवैध नळजोडणीवर फोडण्यात आलंय. दुषित पाणी पुरवठा थांबवण्याकरता महानगरपालिका प्रयत्न करण्याऐवजी आपली हतबलता व्यक्त करत आहे. जर अवैध नळजोडणी जबाबदार असेल तर त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही. असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.
First Published: Thursday, September 13, 2012, 18:05