Last Updated: Thursday, May 31, 2012, 13:00
www.24taas.com, चंद्रपूर चंद्रपुरातील ताडोबा दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी चक्क चंद्रपूरचे भाजप पदाधिकारी पोचले. आपल्या चंद्रपूर दौ-यात राज नागपूरहून थेट दाखल झाले ते ताडोबा जंगलात.
रात्री उशिरा राज चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या विश्राम गृहात पोचले. दिवसभराच्या श्रमानंतर त्यांनी कुणालाही भेटीला पाठवू नका.असा संदेश त्यांनी आपल्या सहकारी आमदार व समर्थकांना दिला. मात्र थकलेल्या राज यांना आपला निर्णय लगेच बदलवावा लागला. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहक्षेत्रात आलेल्या राज यांच्या स्वागतासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्या खास कार्यकर्त्यांची फौज पाठविली होती. अर्थातच ते मात्र हजर नव्हते.
थकलेल्या राज यांच्या चेह-यावरचा तणाव निवळला पुढच्या क्षणाला राज प्रतीक्षा करणा-या भाजप पदाधिका-यांच्या भेटीसाठी पोचले. सुधीर मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पुष्पगुच्छाचा आणि भेटीचा स्वीकार केला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधून , फोटो सेशन आटोपून राज आपल्या कक्षात परतलेही. परंतु राज्य आणि स्थानिक स्तरावरील मनसे नेत्यांच्या चेह-यांवरील प्रश्नचिन्हे दिसून आलीत. राज येतात , थेट भाजप नेत्यांशी भेटतात अन जातात हे काही निमित्त नक्कीच नाही. आधी राज यांची भाजप कार्यालयात चहापान भेट, मग नाशिकमध्ये गळा भेट व आता चक्क भाउंनी चंद्रपुरात केलेले स्वागत. याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
युतीत सहभागी असलेल्या एका पक्षाला राज या नावाची अलर्जी असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज यांचे स्वागत कसे केले. राज यांची ही दुसरी चंद्रपूर भेट आहे. मात्र याच भेटीत भाजपचा हा उत्साह दिसला. शिवसेनेला वाकूल्या दाखवत भाजपने जोपासलेले मनसे प्रेम अविरत सुरु असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
First Published: Thursday, May 31, 2012, 13:00