चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर - Marathi News 24taas.com

चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर

 www.24taas.com, चंद्रपूर
चंद्रपूरच्या जंगलात वाघांपाठोपाठ आता चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील जुनोना भागातून पोलिसांनी चितळ्यांची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून चितळ्याचे ताजे कातडेही जप्त केले आहे.
 
वाघांच्या शिकारीच्या वाढत्या घटनानंतर जिल्हाभरातील पाणवठ्यांवर २४ तास देखरेख केल्याचा दावा केला जातोय. असं असतानाही शिकाऱ्यांनी या जंगलात डाव साधलाच. पोलिसांना स्थानिक खबऱ्यांकडून या भागात चितळाची शिकार झाल्याची माहिती मिळाली. या गुप्त माहितीचा मागोवा काढत पोलीस जुनोना भागात पोहचले. बुद्धोसिंग टांक आणि संतोष सिंग टांक अशा दोन सराईत शिकाऱ्यांना पोलिसांनी चितळ्याचं ताजं मांस आणि कातडीसह ताब्यात घेतले. बाजारात या कातड्याची किंमत ५० हजार रुपये एवढी आहे, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम.डी. शरणागत यांनी दिलीय.
 
सध्या चंद्रपूरच्या जंगलातील वन्यप्राण्यांवर कधी नव्हे एवढे संकट घोंगावू लागले आहे. त्यातच या शिकारी प्रकरणात स्थानिक सहभाग असल्याचं उघड होत असल्यानं वन विभाग हादरला आहे. चितळ्याची शिकार प्रकरणात पकडलेल्या या दोन शिकाऱ्यांकडून पोलीस जिल्हयातील अन्य शिकार घटनांची माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
.

First Published: Tuesday, June 19, 2012, 17:27


comments powered by Disqus