Last Updated: Thursday, July 12, 2012, 23:17
www.24taas.com, गडचिरोली नक्षलवाद्यांच्या उच्छादामुळे आधीच दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता लोकशाही धोक्यात आलीय. कोरची या अतिदुर्गम तालुक्यात आज ९० टक्के ग्रामपंचायतीतल्या लोकप्रतिनिधींनी एकाच दिवशी सामूहिक राजीनामे दिल्यानं प्रशासन हादरलंय. याशिवाय एकाच दिवशी ३० पोलीस पाटलांनीही राजीनामे दिलेत.
एकीकडे नक्षलवाद्यांची दहशत आणि दुसरीकडे पोलिसांकडून होणारे अत्याचार यामुळे या भागातले नागरिक कोंडीत सापडलेत. ‘राजीनामे द्या अन्यथा मृत्युला सामोरं’ जा असा फतवा गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांनी काढला होता. पोलीसांकडूनही नक्षल समर्थक ठरवून बेदम मारहाण होत असल्यानं नागरिक नाराज आहेत. पोलिसांकडून अन्यायकारक गुन्हे नोंदवले जात असल्यानं हे राजीनामा सत्र अवलंबल्याचं सरपंच संघटनेचं म्हणणं आहे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पालकमंत्रीपद स्वीकारून या जिल्ह्यात विकासासाठी प्रयत्न सुरु केले खरे, पण आता लोकप्रतिनिधींच्या वाढत्या राजीनाम्यामुळे इथली लोकशाहीच धोक्यात येऊ लागलीय. त्यामुळे या परिस्थितीची तातडीनं दखल घेण्याची गरज निर्माण झालीय.
First Published: Thursday, July 12, 2012, 23:17