अकोल्यात काम करायला अधिकारीच नाहीत! - Marathi News 24taas.com

अकोल्यात काम करायला अधिकारीच नाहीत!

www.24taas.com, अकोला
 
अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात आपल्या बेभरवशाच्या कारभारानं प्रसिद्ध आहेत. मात्र आपल्या बेभरवशी कामकाजासाठी प्रसिद्ध असणा-या या दोन्ही संस्थांचा कारभार रामभरोसे चाललाय की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.
 
अकोला जिल्हा परिषद आणि महापालिका... अकोल्यातील सर्वसामान्यांच्या आकांक्षांचं प्रतीक असणा-या या दोन्ही स्वराज्य संस्था.... मात्र या दोन्ही संस्था आपल्या वादग्रस्त कारभारामुळे पुरत्या बदनाम झाल्या आहेत. सध्या अकोल्यातील या दोन्ही स्वराज्य संस्थांवर प्रकाश आंबेडकरांच्या भा.रि.प.- बहूजन महासंघाचा झेंडा आहे.मात्र या दोन्ही ठिकाणी आपल्या कामासाठी येणारी सर्वसामान्य जनता सध्या पुरती सैरभैर झाली आहे. कारण काय तर या याठिकाणी काम करायला अधिकारीच नाही. अकोला जिल्हा परिषदेत थोडे-थोडके एक-दोन नव्हे तर वर्ग एक आणि दोनची तब्बल २८ पदं रिक्त आहेत. महापालिकेतदेखील याहून वेगळी परिस्थिती नाही.जिल्हा परिषद आणि महापालिकेत अधिकारी आणण्याचं सामर्थ्य ना इथल्या सत्ताधा-यांमध्ये आहे ना विरोधकांमध्ये...मात्र या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये राजकीय टोलवा-टोलवीला चांगलाच बहर आलाय.
 
अकोल्यातल्या राजकीय वातावरणामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकेत काम करायला चांगले अधिकारी तयारच होत नाहीत. त्यामुळे इथल्या अधिका-यांची वा न वा दूर करण्यासाठी प्रयत्न करतांनाच जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी आता या बाबींवर गांभीर्यानं आत्मचिंतन करणं गरजेचं झालंय.
 

First Published: Thursday, August 9, 2012, 08:18


comments powered by Disqus