सीमावादावर राज ठाकरे करणार गडकरीशी चर्चा - Marathi News 24taas.com

सीमावादावर राज ठाकरे करणार गडकरीशी चर्चा

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
बेळगाव सीमाप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे. राज यांचं आज सकाळी नागपुरात आगमन झालं आहे. विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. बेळगावच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणं ते आज नितीन गडकरींशी बेळगाव प्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
 
कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळं भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी अशी मागणी राज ठाकरे करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात बेळगावच्या मुद्यावर राज ठाकरेंनी केलेल्या विधानामुळं वातावरण ढवळून निघालं आहे. राज यांच्या नागपूर दौऱ्याकडं साऱ्याचं लक्ष लागलं आहे. मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर राज लगेचच मुंबईला परतणार असल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलं आहे.

First Published: Wednesday, December 21, 2011, 06:51


comments powered by Disqus