Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:18
www.24taas.com, चंद्रपूर 
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रिसॉर्ट बांधण्यासाठी १८ एकर जंगल जाळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली गावाच्या हद्दीतलं जंगल जाळून नष्ट करण्यात आलं आहे.
नागपूरच्या एका कोट्यधीशानं वनविभाग किंवा ग्रामपंचायत कुणाचीही परवानगी न घेता इथलं जंगल जाळून त्या जागेवर रिसॉर्ट बांधण्याचं काम सुरू केलं आहे. वन विभाग कोट्याधीश रिसॉर्ट मालकांपुढं हतबल झाल्याचं हे ताजं उदाहरण आहे. या घटनेनंतर वनविभागानं चौकशीला सुरुवात केली आहे. जिथलं जंगल जाळण्यात आलं आहे, त्या परिसरात एक तलावदेखील आहे. इथं वाघ, बिबटे, सांबर, रानगवे यांचा पाणवठा होता.
मात्र ज्या गावातली ही जमीन आहे, त्या मोहर्ली ग्रामपंचायतीलादेखील या प्रकाराची कल्पना नसल्याचं सरपंचांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे मोहर्ली गावातच वन विभागाची दोन प्रमुख कार्यालयं आहेत. या अवैध बांधकामासाठी साहित्य वाहून नेणारी रोजची वाहनं, मशीनद्वारे खोदण्यात आलेल्या कूपनलिकांचे आवाज या सगळ्या गोष्टी कुठल्याच अधिका-याच्या कानी कशा पडल्या नाही का? असा सवाल उपस्थित झाला.
First Published: Wednesday, February 22, 2012, 15:18