Last Updated: Tuesday, March 20, 2012, 09:20
www.24taas.com, नागपूर 
नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी आघाडी आणि महायुती सज्ज झाली असून सदस्यांची पळवापळवी टाळण्यासाठी शिवसेनेनं आपल्या सर्व सदस्यांना अज्ञात स्थळी पाठवलं आहे. तर काँग्रेसनं शिवसेनेच्या सदस्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी फिल्डिंग लावली असून विजय आपलाचं असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसनं केला आहे. मात्र सध्या जिल्हा परिषदेत भाजपचे २२, शिवसेनेचं ८ आणि गोंडबाना पक्षाचा १ असं मिळून महायुतीचं संख्याबळ ३१ आहे. तर आघाडीचं बहुमत २९ आहे. सत्ता स्थापनेसाठी ३० संख्याबळाची आवश्यकता आहे. त्य़ामुळे पळवापळवी टाळण्यासाठी शिवसेनेनं खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व ८ सदस्यांना अज्ञात स्थळी रवाना केलं आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसनं मात्र शिवसेनेचे काही सदस्य आपल्या संपर्कात असल्याच म्हटलं आहे. आघाडीला सत्ता स्थापनेसाठी अवघ्या एका सदस्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महायुतीला आघाडीकडून कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. एकूण परिस्थिती पाहता एका सदस्याला आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करणार अस चित्र आहे, तर शिवसेनेनं आपले सर्व सदस्य अज्ञात स्थळी पाठवल्यानं बुधवारी नक्की काय होणार याची उत्सुकता आहे.
First Published: Tuesday, March 20, 2012, 09:20