Last Updated: Monday, March 26, 2012, 16:52
www.24taas.com, मुंबई राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सन २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात एकीकडे घरगुती गॅसवर पाच टक्के कर वाढवल्याने त्याची झळ सर्वसामन्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील विभागवार विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध सामाजिक घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सूविधांसाठी तरतूदीकडे लक्ष दिलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक तूटीचा आहे. विक्रीकर संकलनात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.
मुंबईमुंबईतील गिरण्यांसाठी १५३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच ६३० कोटी रुपये खर्चुन अद्यावत रुग्णालयं उभारण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट ते बोरिवली जलवाहतूकीसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नेरुळ ते दक्षिण मुंबई जलवाहतूक प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांरित तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. बच्चे कंपनीसाठी आनंदाची बातमीही अर्थमंत्र्यांनी दिली आहे. गोरेगावमध्ये नवीन प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे.
आदिवासी राज्यातील सहा आदिवासी जिल्ह्यात ६०० पाळणाघरांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आश्रमशाळांसाठी ४०० कोटी रुपयांची प्रस्तावित रक्कम राखून ठेवण्यात आली आहे. तसंच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रक्षिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मराठी भाषामुंबईत भाषा भवन उभारण्यात येणार आहे. तसंच सीमाभागातील मराठी संवधर्नासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मराठी विकास विभागाला पंधरा कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय दुर्मिळ मराठी पुस्तके संगणकावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व प्रशासकीय संस्था यशदाशी संलग्न करण्याचाही निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केला.
न्यायाधिश आणि पोलीसांसाठीच्या तरतूदीराज्यात १०० ठिकाणी जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात येणार असल्यामुळे प्रलंबित खटले लवकर निकालात निघतील अशी आशा करायला हरकत नाही. न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी २३० कोटी रुपये तर पोलिसांच्या निवासासाठी १३० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. कारागृहाच्या विकासासाठी १५ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
काय महाग आणि काय स्वस्तव्यवसाय कर नोंदणी विलंबाचे शुल्क वाढवण्यात आले आहे. बीडीवर १२ टक्के विक्रीकर, सकामेव्यावर पाच टक्के, घरगुती गॅसवर पाच टक्के, नैसर्गिक वायुवरही १२,५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. सीएनजीच्या दरावत वाढ होणार आहे त्यामुळे रिक्षा-टॅक्सी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्कातही वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेल चालणाऱ्या गाड्या महागणार आहेत.
कापड प्रक्रिया उद्योगाला करातून सूट देण्यात आली आहे. कुक्कुटपालनावरील कर कमी केल्याने कोंबड्यांवर सक्रांत येण्याची शक्यता आहे.
ग्राम विकासहगणदारी मुक्त गाव योजनेसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ग्राम स्वच्छतेसाठीही ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील १०० बाजारसमित्यांमध्ये संगणकीय लिलाव सुरु करण्यात येणार आहे. संगणकीय लिलाव पद्धतीमुळे बाजारसमित्यांमधील व्यवहार पारदर्शक पद्धतीने होतील त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वनविकासासाठी ७५ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. कोरडवाहू शेतीसाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्यामुळे बळीराजा सुखावेल. पर्यटन विकासासाठी २२८ कोटी रुपये तर जलवाहतूकीसाठी २५० कोटी रुपयांचा निधीची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे.
विदर्भविदर्भाकडे अर्थमंत्र्यांनी विशेष लक्ष दिलं आहे. विदर्भासाठी कृषी उद्योजकता कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. गडचिरोली आणि गोंदियामध्ये नव्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. सेवाग्राम आश्रमाला विशेष निधी देण्यात येणार आहे.
राज्यात अलिबाग, नंदुरबार, सातारा आणि मुंबई या चार ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेला चार कोटी देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीसाठी १०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. भीमसेन जोशींच्या नावाने पुरस्कार आणि शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विभागीय आणि जिल्हा क्रीडा संकुलांच्या उभारणीसाठी ९० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
First Published: Monday, March 26, 2012, 16:52