बुलढाण्यात दोन संशयित आतंकवादी अटक - Marathi News 24taas.com

बुलढाण्यात दोन संशयित आतंकवादी अटक

www.24taas.com, बुलढाणा
 
औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीतून  दोन संशयित अतिरेक्यांना अकोला एटीएसनं अटक केली आहे. अकिल मोहम्मद युसूफ खिलजी आणि मोहम्मद जाफर हुसेन कुरेशी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही संशयित मध्य प्रदेशातील खांडव्याचे असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
 
आज पहाटेच्या सुमारास चिखली शहरातल्या सैलानी नगर भागातून यांना अटक केल्यानंतर त्यांना अकोल्यामध्ये आणण्यात आलं. आज अटक केलेले संशयित अतिरेकी हे काल औरंगाबादेत अटक करण्यात आलेल्या संशयित अतिरेक्यांचे सहकारी असून हे सर्वजण अबू फैजल ग्रुपचे असल्याचं सांगण्यात येतंय.
 
खांडवा पोलीस  स्टेशन समोरच्या मणिपूरम गोल्ड बँकेवर भरदिवसा दरोडा टाकून याच दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरचा खून केला होता. तसंच १३ किलो सोनंही लुटलं होंतं. ही लुटलेली संपत्ती माल-ए-गनिमतच्या नावाखाली अतिरेक्यांच्या कुटुंबियांना पुरवली जायची.
 
धक्कादायक बाब म्हणजे १९९९ मध्ये औरंगाबादमध्ये झालेल्या इख्वान परिषदेत सफदर नागोरीसह अटक झालेला अब्रार आणि चकमकीत ठार झालेला खलील खिलजीही हजर असल्याचं समोर आलंय. आता या अटकेनंतर अतिरेक्यांच्या मोठ्या नेटवर्कचा छडा लागण्याची शक्यता आहे.
 

First Published: Tuesday, March 27, 2012, 21:06


comments powered by Disqus