ताडोबा जंगल संकटात - Marathi News 24taas.com

ताडोबा जंगल संकटात

आशिष आंबाडे, www.24taas.com, चंद्रपूर
 
चंद्रपूरचं ताडोबाचं जंगल संकटात सापडलंय. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्य़ांमुळे या जंगलातल्या वन्यजीवांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ७५ आगी लागल्या आहेत. या आगींमधून संशयाचा वेगळाच धूर निघतोय.
 
महाराष्ट्राचं भूषण ताडोबा प्रकल्प संकटात सापडलाय. याला कारण ठरलेत उन्हाळ्यात ताडोबामध्ये पेटणारे वणवे. जानेवारी ते मार्च या फक्त तीन महिन्यांमध्ये तब्बल ७५ आगी ताडोबामध्ये लागल्यायत. त्यात मार्च महिन्यातल्या मोठ्या चार आगींमुळे १२ टक्के जंगल जळून खाक झालं आहे.
 
दरवर्षी उन्हाळ्यात बांबूचं घर्षण आणि प्रचंड उष्णता यामुळे वणवा पेटतो. त्याचबरोबर एखाद्या पर्यटकानं फेकलेलं सिगरेट किंवा बीडीचं थोटुकही आग लागण्यासाठी निमित्त ठरु शकतं. जंगलातलं सुकं गवत जाळून टाकायला असे वणवे काही प्रमाणात फायदेशीर असले तरी यावर्षीच्या आगीमध्ये वेगळ्याच संशयाचा धूर निघतोय. या जंगलातल्या काही गावांच्या पुनर्वसनाचा घाट घातला जातोय आणि हे पुनर्वसन टाळण्यासाठीच जाणून बुजून आगी लावल्याचा संशय आहे.
 
या वणव्यात किती वन्यजीवांची हानी झाली याची साधी माहितीही प्रकल्प व्यवस्थापनाकडे उपलब्ध नाही.  फाय़र वॉच टॉवर उभारणं, वणवा प्रतिबंधक पथकं वाढवणं, बचाव कुट्या उभारणं या उपाययोजनांबाबत आग लागून गेल्यावर प्रकल्प व्यवस्थापन जागं झालंय.  गेल्या वर्षांत ताडोबामध्ये ६९ वाघांची विक्रमी नोंद झाली. वाघांबरोबरच २८ बिबटे, दीड हजारांपेक्षा जास्त लांडगे आणि दोन हजारांपेक्षा जास्त हरणं अशा वनसंपत्तीनं ताडोबा बहरलंय. वनसंपत्तीनं संपन्न असलेलं हे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार असेल, तर ही निश्चितच दुर्दैवाची गोष्ट आहे.
 
 

First Published: Tuesday, March 27, 2012, 23:11


comments powered by Disqus