नक्षल हल्ला : २२ संशयितांची चौकशी सुरु - Marathi News 24taas.com

नक्षल हल्ला : २२ संशयितांची चौकशी सुरु


www.24taas.com, गडचिरोली
 
 
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी CRPF जवानांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झालेत. तसंच २८ जवान जखमी झालेत. या घटनेनंतर 22 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील हे गडचिरोलीला भेट देणार आहेत. ते आता नागपुरात दाखल झाले आहेत.
 
 
नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पुन्हा रक्तपात घडवून आणलाय. नक्षल्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची बस स्फोटकांनी उडवून दिली. या स्फोटात १२ जवानांचा मृत्यू झाला तर २८ जण जखमी झाले. धानोरा तालुक्यातील पुस्तोली गावाजवळ ही घटना घडली. स्फोटानंतर परिसरातच दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी जखमी जवानांवर गोळीबार केला. शिवाय त्यांची शस्त्रास्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या जीवाची बाजी लावत जखमी जवान गोविंदकुमार मौर्य यानं जखमी साथीदारांना सुरक्षित स्थळी हलवलं. तर जवानांकडून शस्त्र हिसकावणा-या चार ते पाच नक्षलवाद्यांना पकडलं.
 
 
स्फोटात जखमी झालेल्या ८ जवानांवर नागपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींपैकी एक जवानाच्या डोक्याला गोळी लागली. स्फोटानंतर परिसरात कोबींग ऑपरेशन सुरु करण्यात आलं असून 22 जणांना ताब्यात घेण्यात आलयं. नक्षलवाद्यांनी या परिसरातली सामान्य वाहतूक अगोदरच बंद केली होती. हा संकेत जर सीआरपीएफच्या अधिका-यांना समजला असता तर ही दुर्घटना टळली असती अशी चर्चा सुरु झालीये. एकूणच या स्फोटानंतर स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफमध्ये समन्वयाचा अभाव होता हे स्पष्ट झाल आहे.
 
 

First Published: Wednesday, March 28, 2012, 09:47


comments powered by Disqus