Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53
झी २४ तास वेब टीम, धुळे धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
यंदा खरीप हंगामातल्य़ा प्रतीकुल वातावरणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार यांच्या हातीही यंदा काहीच पडण्याची शक्यता नव्हती. त्यातच युनियन बॅँक आणि इतर पतसंस्थेची १५ लाखाहून अधिकच कर्ज थकित होतं. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या शेतकऱ्याला कुठलाच मार्ग दिसेनासा झाल्याने त्यांनी अखेरचा निर्णय घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी मात्र मुलाने कर्ज फेडावं अशी प्रकाश खैरनार यांनी इच्छा व्यक्त केली.
आत्महत्यापूर्वी आणि नंतरही प्रकाश खैरनार यांची कर्ज फेडण्याची इच्छा कायम होती. मात्र निसर्ग आणि सरकारच्या धोरणापुढे या स्वाभिमानी शेतकऱ्याला हात टेकावे लागले. शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी ही सरकारी व्यवस्था जास्त काळ शेतकऱ्याला न्याय देऊ शकली नाही तर, येत्या काळात शेतकरी मात्र सरकारच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपत चालली आहे.
First Published: Tuesday, November 22, 2011, 13:53