भूमाफियांनी चिखलीत आरक्षित जागा विकली - Marathi News 24taas.com

भूमाफियांनी चिखलीत आरक्षित जागा विकली

www.24taas.com, बुलढाणा
 
बुलढाणा जिल्ह्यतील चिखलीमध्ये भूखंड माफियांनी आरक्षित भूखंड विकून  करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. विशेष  म्हणजे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा करण्यात आलाय. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
 
चिखली नगर पालिका हद्दीतील सर्व्हे क्रमांक 202 मधील हा भूखंड पार्कसाठी नगर पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आला होता. मात्र, या भूखंडातील जागेची आता सर्रास विक्री करण्याचं काम सुरू झाल्याचं उघड झालंय. एकाच क्रमांकाचे एकाच दिवशी दोन आदेश पारित झाल्यानं या भूखंडातील गोलमाल समोर आलंय.
 
हा प्रकार शेत सर्व्हे 202 पुरता मर्यादित नसून चिखलीतील असे अनेक आरक्षित आणि बिगर आरक्षित भूखंड बनावट आदेश तयार करुन विकले जातायंत. याबाबत जिल्हाधिकारी तसंच आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीची कुठल्याचं पातळीवर दखल घेण्यात आली नसल्यानं कापसे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.
 
नागपूर खंडपीठाने याप्रकरणी जिल्हाधिका-यांना चौकशीचे आदेश दिलेत. यात अडकलेल्या संबंधित अधिका-यांवर ठोस कारवाई होईल, अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत.
 

First Published: Sunday, April 22, 2012, 16:31


comments powered by Disqus