Last Updated: Saturday, April 28, 2012, 19:18
www.24taas.com, आशिष आम्बाडे, चंद्रपूर 
मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेत चंद्रपूर पोलिसांनी 'दक्ष SMS अलर्ट सिस्टीम' आणि 'SDR' या दोन सेवा सुरू केल्या आहेत. या दोन्ही सेवांचा प्रारंभ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. गुन्हेगारी रोखून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या दोन नव्या सेवा सुरू करण्यात आल्य़ा आहेत. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असच चित्रं सगळीकडे पहायला मिळतं.
जसा मोबाईलचा वापर वाढला तसं त्या अनुशंगाने येणारे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न वाढले. त्यावर मात करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी दक्ष SMS अलर्ट सिस्टीम आणि SDR या दोन सेवांचा प्रारंभ केला. यातल्या दक्ष SMS अलर्ट सिस्टीममध्ये जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा एक मोठा डेटा बेस साठवण्यात आला आहे. या सेवेच्या माध्यमातून त्यांना जागरुक राहण्याच्या सुचना, वाहतूक विषयक सुचना, अफवा निराकरणाच्या सुचनाविषयी SMS पाठवले जाणार आहेत.
दुसऱ्या म्हणजे SDR सेवेच्या माध्यमातून नोंदणीकृत मोबाईल धारकांची तात्काळ माहिती दिला जाणार आहे. त्यामुळे मोबाईल वरुन केले जाणारे गुन्हे, अश्लील SMS,धमक्या आदींबाबत पोलिसांनी नंबर दिल्यास ते त्या व्यक्तीचं नाव,पत्ता हुडकुन काढू शकतात. या दोन्ही सोवांमुळे गुन्हेगारी रोखण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त होतो आहे. नागरिकांना मोबाईलचे खूप फायदे आहेत पण काही दुषप्रवृत्तींमुळे त्यांना त्रासही सहन करावा लागतो. अशा सेवा जर योग्यरितीने कार्यान्वित झाल्या तर त्याचा नक्कीच चंद्रपूरकरांना फायदा होईल अशी अपेक्षा करुया.
First Published: Saturday, April 28, 2012, 19:18