Last Updated: Sunday, May 6, 2012, 13:10
www.24taas.com, चंद्रपूर 
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचा दिवस वन्यजीव प्रेमींसाठी विशेष असतो. देशातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात या दिवशी दिवस-रात्र अशा २४ तासाच्या एका सत्रात वन्यजीव प्रेमी, हौशी अभ्यासक आणि वन विभागाचे अधिकारी - कर्मचारी जंगलातील वन्यजीवांच्या संख्येचा त्यांच्या वैविध्यतेचा अंदाज वर्तविण्यासाठी एकत्र येतात. वन्यजीवांच्या गणनेबरोबर महत्वाच्या नोंदी आजच्या दिवशी केल्या जातात.
चंद्रपुरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. अभयारण्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे आहेत. २४ तासातून एक वा दोन वेळेस जंगलातील प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी हमखास येतात. पाणवठ्याशेजारून प्राण्यांचं निरीक्षण करता यावं यासाठी मचाण उभारण्यात आले आहेत.
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ३ वन-परिक्षेत्र विचारात घेता एकूण १३९ मचाणी उभारण्यात आल्या आहेत. वन्यजीव अभ्यासकांना प्राण्यांच्या दुनियेत डोकावण्याची आणि तिची जवळून झलक घेण्याची संधी मिळते. म्हणूनच या गणनेला वन्यजीव संरक्षण कार्यक्रामात विशेष महत्व आहे.
First Published: Sunday, May 6, 2012, 13:10