Last Updated: Friday, December 14, 2012, 15:47
www.24taas.com, नागपूर ‘मी लढण्यासाठी जन्माला आलो आहे, रडणार नाही... जानेवारीपासून विरोधकांचा समाचार घेऊ’ असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. ते नागपूरात बोलत होते.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज नागपुरात आहेत. नागपुरातल्या डॉ. देशपांडे सभागृहात विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा... पदाधिकारी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांना दिलीय.
यानिमित्तानंच बाळासाहेबांची जागा कुणीच घेऊ शकत नाही असा पुनरूच्चार उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलाय. पण, बाळासाहेबांच्या समाधीस्थळाच्या मुद्यावर माघार घेत नरमाईच्या भूमिकेचे संकेत सामनातून दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मात्र ठाकरी शैली वापरली. ‘शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणार… त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र मी घडविणार... आपण विरोधकांचा समाचार घेऊ पण जानेवारीपासून… , असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या येत्या काळातील वाटचाल कशी असेल, याचा एक चुणूक दाखवून दिलीय. फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा मेळावा घेणार असल्याचंही उद्धव यांनी यावेळी म्हटलंय.
First Published: Friday, December 14, 2012, 15:47