Last Updated: Tuesday, January 14, 2014, 20:36
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणाऱ्या धोक्याला ‘झी मिडीया’ने अधोरेखेकित केलं असतानाच, आज याच धारदार मांजाने एका युवकाचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत राहुल नागपुरे या २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. वडिलांचं आधीच निधन झाल्याने आईसह दोन बहिणींची जबाबदारी राहुलवर होती. पण कुटुंबाच्या एकुलत्या एक कमवत्या मुलाचा नायलॉन मांजाने बळी घेतला. या नागपुरे कुटुंब हवालदिल झालंय. राहुलच्या या मृत्यूला जबाबदार कोण? बेजबाबदार पतंग प्रेमी की निर्ढावलेलं प्रशासन? याचा गांभीर्यानं विचार वेळ आलीय.
दिल्ली आणि उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात नागपुरात येणाऱ्या हा नायलॉन मांजा किती घातक आहे हे ‘झी मिडीया’नं आधीच दाखवलं होतं. सहा वर्षांपूर्वी याच मांजानं एका चार वर्षांच्या निष्पाप बाळाचा जीव घेतला होता. पण एक बळी गेल्यावरही पतंग प्रेमींचे डोळे उघडले नाहीत. हुडकेश्वर भागात राहणारा २६ वर्षाचा राहुल नागपुरे संक्रांतीच्या सुट्टीच्या निमित्ताने आपल्या आईला सोडून घरी परतत होता. पण ही सुट्टी आपल्या आयुष्याची शेवटची ठरेल याची पुसटशी कल्पनादेखील त्याला नव्हती. आशीर्वाद नगर भागात उडत असलेल्या पतंगीच्या नायलॉन मांजाचा त्याच्या गळ्याभोवती फास आवळला गेला. मांजा अतिशय धारदार असल्यानं त्याचा गळा चिरला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तासाभरात त्याचा मृत्यू झाला.
पतंग प्रेमीच काय पण स्थानिक प्रशासन या जीवघेण्या नायलॉन मांजामुळे जागं झालेलं नाही. राहुलचे वडील लहानपणीच वारले होते. त्यामुळे घर चालवण्याची आणि आईसह दोन बहिणींची जवाबदारी त्याच्यावर होती. आता या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? पतंग प्रेमी की प्रशासन...
नायलॉन मांजा घातक असून यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी ‘झी मीडिया’नं आधीच केली होती. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेनंतर नायलॉनच्या या घातक मांज्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ‘झी मीडिया’ नागपूरसह संपूर्ण राज्याच्या जनतेला करत आहे.
व्हिडिओ पाहा - *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 20:14