अमळनेरच्या कुटुंबाचा जातपंचायतीकडून छळ,Amalaner family abused by jatapancayat

अमळनेरच्या कुटुंबाचा जातपंचायतीकडून छळ

अमळनेरच्या कुटुंबाचा जातपंचायतीकडून छळ
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

जातपंचायतीच्या बहिष्काराच्या झळा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मधल्या एका कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत. समाज मंगल कार्यालयाच्या अतिक्रमित बांधकामाबद्दल नगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीचा राग आल्यानं बारी समाज पंचायत मंडळानं रमेश बारी यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. पोलिसांकडून योग्यरीत्या प्रकरण न हाताळलं गेल्यानं अखेर याप्रकरणी बारी यांना कोर्टाची पायरी चढावी लागलीय.

अमळनेर मधील साळीवाडा भागात राहणारे रमेश बारी गेल्या नऊ महिन्यांपासून एका समाजिक संकटाचे शिकार बनलेय. त्याचं कारणही तसं किरकोळच आहे. रमेश बारी यांच्या घराशेजारीच बारी समाजाचं मंगल कार्यालय आहे. या कार्यालयावर आणखी एक मजला चढविण्याचं काम पंच मंडळानं सुरु केलं होतं. मात्र हे बांधकाम विनापरवाना असल्यामुळं याबाबत बारी यांनी नगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती. त्यावरून पंचमंडळाला नगरपालिकेनं १८ हजारांचा दंड प्रस्तावित केला होता. याबाबत बारी समाज पंचमंडळ खवळले.

पंचमंडळानं तातडीची बैठक घेऊन रमेश बारी यांनीच आता या दंडाची रक्कम भरावी असा फतवा काढला. तसं न केल्यामुळं त्यांचं कुटुंबच पंच मंडळानं बहिष्कृत करून टाकलं. याबाबत पोलिसांकडं तक्रार करूनही उपयोग न झाल्यामुळं बारी यांनी अमळनेर कोर्टात धाव घेतली. कोर्टानं या प्रकरणी पंचमंडळ विरुद्ध पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी पंचमंडळाचे अध्यक्ष सुपडू बारी, दगडू बारी, निंबा बारी आणि लोटन बारींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

जात पंचायतीच्या या जाचक निर्णयामुळं रमेश बारी यांच्या कुटुंबावर मोठं सामाजिक संकट ओढवलंय. त्यांना समाजाच्या बैठकीत बसू दिलं जात नाही, मेळाव्यात सहभागी केलं जात नाही, लग्न कार्यात बोलावलं जात नाही, इतकंच काय तर लग्नाची पत्रिकाही घरातल्या एका महिलेच्या नावानं पाठविली जातेय. भविष्यात त्यांच्या मुलाचं लग्न ठरवतानाही अडचणी येण्याची चिंता त्यांना सतावतेय.

एकीकडे जग एकविसाव्या शतकात वाटचाल करतंय. मात्र अजूनही काही जण या जातकुळीत अडकून पडतायेत. बहिष्कार टाकल्यानं रमेश बारी यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात बारी पंच मंडळ यशस्वी होईलही. मात्र आणखी किती काळ अशा जात पंचायतीच्या जाचाला रमेश बारी यांच्यासारख्या कुटुंबांना सामोर जाव लागणार हाच खरा प्रश्न आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 18:18


comments powered by Disqus