बाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद! Balasaheb`s name to Nashik`s museum

बाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!

बाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून राजकारण सुरु असतानाच, नाशिकमध्ये शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.

नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये संघर्ष उफाळून आला. बाळासाहेबांचं स्मारक असावं अशी मागणी शिवसेनेनं महासभेत मांडली होती. त्याला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. मात्र आठ महिन्यांत सत्तधारी मनसे बाळासाहेबांचं स्मारक उभारण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे मनसेचा निषेध करत शिवसैनिकांनी नियोजित इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन आंदोलन छेडलं.

महापौरांनी शिवसेनेचा दावा खोडून काढलाय. त्याचबरोबर मुंबईत शिवसेनेची सत्ता असूनही स्मारक उभं राहू शकलं नाही, असा टोला लगावायलाही ते विसरले नाहीत. दोन्ही सेना बाळासाहेबांना ‘दैवत’ मानत असल्यातरी दैवताच्या नावावरून राजकारण खेळण्याची संधी मात्र सोडत नाहीयत. शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देवून संघर्षाची मशाल यापुढे पेटती ठेवण्याचा निर्धार केलाय. तर महापौरांनीही इतिहास संग्रहालयाचं काम ८० टक्के पूर्ण झाल्याचं सांगून ही जागा मिळणार नाही, असा सूचक इशाराच दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 1, 2013, 19:46


comments powered by Disqus