Last Updated: Wednesday, August 29, 2012, 08:16
अन्न भेसळ विभागानं मंगळवारी शिर्डीतील साईबाबा संस्थानकडे असलेल्या तब्बल 1 लाख 20 हजार खराब झालेले लाडू एका खडयात पुरत नष्ट केले. त्याच बरोबरीनं काही खराब तुपही नष्ट केलं.
साईसंस्थानच्या वतीनं विकण्यात येणाऱ्या प्रसाद लाडूंची चव कडवट लागत असल्याच्या अनेक भक्तांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर साईसंस्थाननं लाडूचं उत्पादन थांबवलं होतं. साईसंस्थानानं लाडू बनविण्यासाठी मध्य प्रदेशातल्या ग्वालियरमधून गायीचं गावरान तुप मागवलं होतं. मात्र यापासून बनविण्यात येत असलेले लाडू आणि सत्यनारायण प्रसाद कडवट लागत होता. मंगळवारी अऩ्न आणि औषध भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी शिर्डीत येऊन संबंधित तुपाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले.
चंबल डेअरी प्रोडक्टचे महारतन या ब्रँडचे 1331 डब्बेही सील केलेत. या तुपाची किंमत तब्बल 45 लाख रुपये इतकी आहे. साईसंस्थाननं या तुपापासून तब्बल 1 लाख 50 हजार लाडू बनवले होते. मात्र त्यातील काही लाडू विकण्यात आले होते. मंगळवारी अन्न आणि औषध भेसळच्या अधिकाऱ्यांनी साईसंस्थानकडे असलेले तब्बल 1 लाख 20 हजार लाडू नष्ट करण्याचे आदेश दिल्या नंतर रात्री उशीरा साईसंस्थानच्या प्रसादालया मागे एक 20 बाय 20 चा खड्डा करत त्यात लाडू पुरण्यात आले. या लाडवांची किम्मत 8 लाख रुपये इतकी आहे. हा सर्व प्रकार झाल्या नंतर आता या सर्व प्रकरणाची जबाबदारी कुणाची?असा प्रश्न उपस्थित होतोय.
First Published: Wednesday, August 29, 2012, 08:16