Last Updated: Wednesday, October 24, 2012, 18:27
www.24taas.com, नाशिक बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर या सर्वोच्च किताबाला गवसणी घालण्याचा पराक्रम नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदीत गुजराथी यानं केलाय. अवघ्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर बनणारा विदीत हा महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर बनलाय.
विदीतच्या रुपानं तब्बल १३ वर्षांनी महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर लाभला आहे. महाराष्ट्राचे पहिले ग्रॅँडमास्टर प्रविण ठिपसे यांच्यानंतर १९९९ मध्ये अभिजित कुंटे यांनी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर किताब पटकावला होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर गवसला नव्हता. विदितच्या रूपानं एका तपाहून अधिक काळानंतर ग्रॅँडमास्टर गवसल्यानं महाराष्ट्रातील ग्रॅँडमास्टर्सची संख्या तीन झालीय. यापूर्वीचे दोघंही आपल्या वयाच्या पंचविशीमध्ये ग्रँडमास्टर म्हणून नावारुपाला आले होते. पण, अवघ्या १८ व्या वर्षी हा किताब पटकावत विदित महाराष्ट्राचा सगळ्यात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर ठरलाय. नागपूरला सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर चेस कॉम्पिटिशनमध्ये नवव्या राऊंडअखेर त्याला आवश्यक एक नॉर्म प्राप्त झाल्याने तो महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर बनला आहे.
First Published: Wednesday, October 24, 2012, 18:27