Last Updated: Monday, October 15, 2012, 19:08
योगेश खरे, www.24taas.com, नाशिकअत्यावश्यक औषधे आणि तांत्रिक सुविधा नसल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होते आहे. गेल्या आठवड्यात व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याने त्याचा संताप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निघाला आहे.त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयच सध्या रुग्णशय्येवर असल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन बंद आहे. ही अत्यावश्यक सुविधा तर बंद आहे, त्याचबरोबर सलाईन्स, औषधाच्या गोळ्या आणि इंजेक्शन्सही या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. अशी परिस्थिती असतानाच, एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी नर्सेस आणि स्टाफला मारहाण केली. त्यामुळे नर्सेसनंही ‘काम बंद’ आंदोलन पुकारलंय. रविवारीही एका अर्भकाचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. औषध खरेदी मध्यवर्ती पद्धतीनं होत असल्यानं हा गोंधळ होतोय.
एखादं इंजेक्शन संपलं तरी लालफितीच्या परवानग्या घ्याव्या लागत आहेत. मेडिकलच्या रिटेल दरानं सलाईन्स मुंबईतले आरोग्य संचालक खरेदी करतात. त्यामुळे दर्जा दूरच कमिशनसाठी आरोग्य व्यवस्था वेठीला धरली जाते की काय, असा प्रश्न निर्माण झालाय.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत दोघांचा बळी गेल्याचा आरोप होतोय. आता दोघांचे बळी गेल्यावर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न नाशिककर विचारतायत.
First Published: Monday, October 15, 2012, 19:08