चांदण्या पाठीचं कासवामुळं तस्करीचा पर्दाफाश , pranyanchi taskari nashik madhe

चांदण्या पाठीच्या कासवामुळं तस्करीचा पर्दाफाश

चांदण्या पाठीच्या कासवामुळं तस्करीचा पर्दाफाश
www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यात सध्या कासवं, घुबडं यांची अंधश्रद्धेपोटी तस्करी होतेय. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवहारातून होते. नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये या कासवाची विक्री होत होती. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला आणि पुढचा अनर्थ टळला.

‘आसाम टॉरटाईज’ म्हणजेच चांदण्या पाठीचं कासव... या दुर्मिळ जातीच्या कासवाची बाजारातली किंमत आहे वीस लाख रुपये... आठ ते नऊ वर्षांचं हे फक्त जमिनीवर चालतं. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या या कासवाला तातडीनं वैद्यकीय मदत देऊन जीवदान देण्यात आलं. नाशिकमधल्या ओझरच्या एका घरामध्ये या कासवाची विक्री होत असताना पोलीस आणि वन विभागानं छापा टाकला आणि या तस्करीचा पर्दाफाश झाला.

कासव घरात ठेवलं तर संपत्ती येते, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळेच या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. दुर्मिळ असलेल्या आसामातल्या या दुर्मिळ जातीच्या कासवांना आता तस्करीचं ग्रहण लागलंय. कासवाबरोबरच घुबड आणि मांडूळ जातीचे सापही नाशिकमध्ये सर्रास लाखो रुपयांना विकले जातायत. चांदण्या पाठीचं कासव तस्करीच्या बाजारात जवळपास वीस लाखांना विकलं जातं. तर मांडूळाची किंमत पाच लाखांच्या घरात आहे. तर घुबडाच्या जातीवरुन आणि आकारावरुन त्याची किंमत ठरते. एक घुबड ८० हजारांपासून दोन लाखांपर्यंत विकलं जातं. या तस्करीत प्रचंड मोठी उलाढाल होते.
निसर्गचक्रामध्ये सगळ्याच वन्यजीवांना महत्त्वाचं स्थान आहे. पण तस्करीमुळे हे वन्यजीव धोक्यात आलेत. परिणामी निसर्गचक्रही धोक्यात येणार आहे.

First Published: Saturday, September 1, 2012, 00:10


comments powered by Disqus