Last Updated: Wednesday, May 14, 2014, 17:07
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय. यावरून राज ठाकरे बेचैन आहेत, असं सांगितलं जात आहे. पण राज यांच्या या भेटीमुळे नाशिक मधील मनसेचे दोन आमदार, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असल्याचे म्हटलं जाते. पण पक्षाची कामगिरी मात्र नाशिकमध्ये समाधानकारक राहिलेले नाही. एक्झिट पोलचे संपूर्ण विश्लेषण राज यांच्याकडे आल्यानंतर राज यांनी नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी काही नगरसेवकांनी नाशिक मनपाचे कामं उत्तम चालू असल्याचे सांगितल्यावर, ही कामं लोकांपर्यंत का पोहोचली नाही, असा सवाल करत राज ठाकरे यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे नाशिकमधील पक्षाची पडझड कशी रोखता येईल, या बाबत विचार विनिमय करण्यासाठीच राज ठाकरे यांनी ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांची भेट घेतल्याचं समजतंय. या भेटीमध्ये मात्र नाशिकमधील पक्षाचे महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना डावलल्याने काही पदाधिकारी राज ठाकरेंवर नाराज असल्याचे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 17:07