Last Updated: Sunday, June 23, 2013, 18:58
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिक शहराची अनेक वर्षांची ओळख आता पुसली जाणार आहे. शहराच्या मध्यवस्तीत असणारा फुलं बाजार हटवण्याचा निर्णय महापालिकेन घेतलाय. पहिल्या पावसात महापौरांच्या प्रभागात पाणी साचल्याचं खापर फुलं विक्रेत्यांवर फोडून, गेल्या अनेक दिवसांच्या सराफ व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
नाशिकच्या सराफ बाजार, सरकारवाडा परिसरात दरवळणाऱ्या ताज्या फुलांचा सुगंध आता थोडेच दिवस नाशिककरांना अनुभवता येणार आहे. ज्या नाशिकला कधीकाळी गुलशनाबाद म्हणून गौरविल जायचं त्याच नाशिक शहराच्या मध्यवस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून फुलं बाजार थाटायचा. गोदाकाठी बरीचशी मंदिर असल्यानं भाविक इथल्या फुलं विक्रेत्यांकडून फुलं घेऊन जात, तर शहराच्या कानाकोपऱ्यात राहणारे नाशिककर सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रमासाठी याचं फुलं बाजारातून फुलं घेऊन जात असत. मात्र सहा जूनच्या पहिल्या पावसात महापौरांच्या प्रभागातील सराफ बाजारासह इतर परिसर जलमय झाला. त्याला महापलिकेच्या नाकर्तेपणापेक्षा फुलं विक्रेत्यांना जबाबदार धरण्यात आलंय.
फुलं विक्रेत्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही या निर्णयाला सहमती असल्याचा दावा केला जात असला तरी हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब फुलं विक्रेते मात्र या निर्णयानं कमालीचे नाराज झालेत. पंचवटीतील ज्या भाजी बाजारात या फुलं विक्रेत्यांना विस्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुळात त्याठिकाणी गंगाघाटावरील भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचे गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाने प्रयत्न सुरु आहेत. मात्र न्यायालयीन लढाई लढणारे भाजी विक्रेते प्रशासनाचे आदेश धुडकावून लावत असल्यानं फुलं विक्रेत्यांचा बळी देण्याचा हा प्रकार असल्याची भावना व्यक्त होतेय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 23, 2013, 18:58