पोलीस 'निवडणुकीची' चेष्टा - Marathi News 24taas.com

पोलीस 'निवडणुकीची' चेष्टा

www.24taas.com, नाशिक
 
पोलीस दलात निवड झाल्यानं देशाची सेवा करायला सज्ज असतानाच निवड रद्द झाल्याची चिठ्ठी हातात पडते. नाशिकमधल्या काही विद्यार्थिनींच्या बाबतीत असंच घडलंय. विशेष म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्याकडून काम करुन घेतल्यावर त्यांना त्यांची निवड रद्द झाल्याचं कळवण्यात आलंय.
 
नाशिक शहरातल्या पोलीस आयुक्तालयासाठी डिसेंबरमध्ये पोलीस भरती करण्यात आली होती. त्यामध्ये १३० जणांची निवड करण्यात झाली. यामध्ये ९४ मुलींचा समावेश होता. निवड झाल्यावर लगेचच त्यांना निवडणूक कामकाजासाठी पाच दिवस रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. मतदान आणि मतमोजणीदरम्यान सुरक्षा चोखपणे पार पाडली. मात्र अचानक या महिन्यात त्यांना निवड रद्द झाल्याचं कळवण्यात आलं.
 
पोलीस प्रशासनानं मात्र सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार आरक्षणात बदल झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगत हात वर केलेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच भरतीची प्रक्रिया झाली असताना, कोर्टाचा नंतरचा निर्णय कसा काय लागू होतो, असा प्रश्न निवड झालेल्या मुलींना पडलाय.  यासंदर्भात त्यांनीही कोर्टाचा दरवाजा ठोठवलाय. त्याचबरोबर प्रसंगी आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय.
 

First Published: Wednesday, May 30, 2012, 22:37


comments powered by Disqus