Last Updated: Friday, June 1, 2012, 23:15
www.24taas.com, नाशिक पेट्रोल दरवाढीनंतर रिक्षाचालकांनी अघोषित दरवाढ केली आहे. त्रासलेल्या प्रवाशांनी याप्रकरणी आरटीओकडे तक्रार केलीये. तक्रारीवरुन २० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आलीये.
महागाईनं होरपळलेल्या जनतेला २३ मे रोजी तब्बल साडेसात रुपयांच्या पेट्रोल दरवाढीला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर अनेक रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जास्तीचं भाडं आकारण्यास सुरुवात केली. शहरातील शालीमार चौकातून नाशिक रोड रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी १५ रुपये भाडं आहे. आता २० रुपयांची मागणी केली जाते. शहरातील इतर मार्गावरुन देखील २ ते ५ रुपयांची भाडेवाढ रिक्षाचालकांनी केलीये. आधीच मुजोरपणे वागणा-या रिक्षाचालकांच्या या कृतीनं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय.
रिक्षाचालकांविरुद्धच्या सुमारे ४० ते ५० तक्रारी आरटीओकडे दाखल झाल्या आहेत. त्यानुसार आरटीओ अधिका-यांनी २० ते २५ रिक्षाचालकांवर कारवाई केलीये. रिक्षाचालकांनी अघोषीत भाडेवाढ त्वरीत थांबवावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जाण्याचा इशारा प्रादेशीक परिवहन अधिका-यांनी दिलाय. गेल्याच महिन्यात प्रादेशीक परिवहन विभागानं रिक्षाचालकांना अधिकृतपणे दरवाढ करुन दिलीये. पुन्हा मनमानी करुन दर वाढवल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय.
First Published: Friday, June 1, 2012, 23:15