दुषित गोदावरी, प्रशासन आधांतरी - Marathi News 24taas.com

दुषित गोदावरी, प्रशासन आधांतरी

मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
 
गोदावरीच्या पाणवेलींचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय. महापौरांनी पहाणी दौरा केला. स्थायी समिती सभापतींनी पाणवेली काढण्याचं आश्वासन दिलं. पालकमंत्री छगन भूजबळ यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. एवढं होऊनही प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही.
 
गोदामाईच्या अवस्थेवरुन शहरात राजकारण रंगू लागलंय. मात्र गोदामाई मोकळा श्वास कधी घेणार याचं उत्तर लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही. याप्रश्नी नागरिकांनी पुढाकार घेऊन गोदाकाठावर उपोषण करुन प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. मात्र ढीम्म प्रशासन जागं होण्यास तयार नाही. गोदापात्रात जे ड्रेनेजचे पाणी सोडलं जातंय ते पहिल्यांदा थांबवावं. त्यानंतर पाणवेली काढण्यात सुरुवात करावी, अशी मागणी होतेय.
 
या प्रश्नी महापौरांचा पाहणी दौरा होऊन दोन माहिने झाले तरी काहीच कार्यवाही झाली नाही. तर उपममहापौर प्रशासनावर खापर फोडून मोकळे झालेत. स्थायी समितीचे सभापती कॉंग्रेसचे आहेत. मनसे-भाजपला शह देण्यासाठी तेही याप्रश्नी आपले घोडे दामटतायेत. दुसरीकडं पालकमंत्री पाणवेली काढण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचं सांगायला विसरले नाहीत.
गेल्या चार महिन्यांपासनं पालिकेचं प्रशासन अधांतरी आहे. जिल्हाधिक-यांकडे आयुक्तपदाचा अतिरीक्त कारभार आहे. मात्र तेही 8-10 दिवसांच्या रजेवर गेल्यानं गोदावरी प्रदुषणासह शहरातल्या इतरही समस्या कधी सुटणार हा प्रश्न आहे.
 

First Published: Saturday, June 2, 2012, 17:53


comments powered by Disqus