Last Updated: Sunday, June 10, 2012, 10:50
www.24taas.com, धुळे धुळे जिल्ह्यात चार तालुक्यांपैकी तीन तालुक्यामध्ये भूजल पातळी खाली जात असल्यानं भूजल वैज्ञानिकांची चिंता वाढत आहे. कारण वेळीच व्यापक स्तरावर जल पुनर्भरणाचं काम न झाल्यास येत्या काही काळातच जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती अटळ ठरणार आहे.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये अर्धा मीटरपेक्षा जास्त पाणी पातळी खाली गेलीय. पाणी पातळी खाली गेल्यानं त्याची गुणवत्ताही ढासळतेय. अर्थातच याचा विपरित परिणाम हे पाणी पिण्यासाठी वापरत असलेल्या जनतेवर आणि शेतीपिकांवर जाणवू लागलाय. शिंदखेडा तालुक्यात तर पाणी पातळी 30 फुटांपेक्षा अधिक खाली गेलीय. गेल्या पाच वर्षांत ही या तीन जिल्ह्यातली परिस्थिती आहे.
केवळ शिरपूर तालुक्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे इथं पाण्याची पातळी जलपुनर्भरणाच्या कामामुळे पाच मीटरनं वाढली. जिल्ह्यातली जनता वेळीच पाण्याबाबत जागृत झाली नाही तर भविष्याच भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी पावसाचा थेंब न् थेंब अढवणं ही काळाची गरज झाली आहे.
First Published: Sunday, June 10, 2012, 10:50